नऊ वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ७० वर्षीय वृध्दास खामगाव येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश पी.पी. कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. रामकृष्णा उखर्डा गवई असे शिक्षा झालेल्या वृध्दाचे नाव आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ‘भारतीय दंड संहिता कलम ३७६ (अ,ब), तसेच क ६ सहकलम १८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती गुन्हा सिध्द करण्याच्या अनुषंगाने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ७ साक्षिदाराची साक्ष नोंदविण्यात आली त्यात प्रकरणातील पीडीता व पीडितेची आई फिर्यादी यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड.रजनी बावस्कर यांचा युक्तीवाद ग्राहय मानून आरोपीविरूध्द कलम, ३७६ (अब), सहकलम ५११ भादंवी तसेच क ६ सहकलम १८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अनुसार दोषारोप सिध्द होत असल्याचा न्यायनिर्णय दिला. मात्र, नियमाप्रमाणे कोणत्याही एकाच कायद्याअंतर्गत आरोपीस शिक्षा सुनावता येते म्हणून आरोपीस भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ (अब) सहकलम ५११ अंतर्गत १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी एपीआय द्वारकानाथ गोंदके यांनी केला.सरकार पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता तथा स्पेशल एपीपी ॲडव्होकेट रजनी बावस्कार यांनी कामकाज पाहिले. तसेच कोर्ट पैरवी महिला सहायक फौजदार चंदा शिंदे यांनी केली.




Users Today : 25