चंद्रपुरापासून काही अंतरावर असलेल्या वेकोली दुर्गापूर सीएचपी बंकर आणि सीएसटीपीएस रोप वे वरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असते. दोन्ही विभागांना वारंवार विनंती करूनही प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही. धुळीमुळे ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता, भाजप अनुसूचित जात जमात आघाडीचे चंद्रपूर तहसील अध्यक्ष नंदू इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी रोपवे गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
CTPS आणि WCL विभाग धुळीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरले. ऊर्जानगर, कोंडी, नेरी येथील १० हजार लोकसंख्येला कोळशाच्या धुळीचा मोठा फटका बसत आहे. काळी कोळशाची धूळ स्वयंपाकघर, अंगण, टेरेस, बाग आणि रस्त्यावर पोहोचत आहे. यामुळे अन्न, पाणी, धान्य, भांडी, कपडे, इत्यादी वस्तूंवर परिणाम होत आहेत. उडणारी काळी धूळ नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहे, त्यामुळे श्वसन, हृदय, दमा, त्वचारोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली आहे.



