Home » Today In Focus » राज आणि उद्धव ठाकरे यांची युती: महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवे वळण?

राज आणि उद्धव ठाकरे यांची युती: महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवे वळण?



गेल्या काही वर्षांत आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अशक्य असलेल्या गोष्टी शक्य होताना आणि शक्य असलेल्या गोष्टी अशक्य होताना पाहिल्या. ठाकरे बंधू अर्थातच उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यावर राजकीय वर्तुळातून देखील अनेक नेते आपापले मत मांडत आहेत. पण सगळ्यांनी उघड बोलून देखील हे दोघे भाऊ मात्र मोजून मापून बोलताना आढळत आहेत. किस्सा सुरू झालेला तो राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीतून.

राज ठाकरे यांचे संकेत

राज ठाकरे यांनी अभिनेता-निर्माता महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले की, “माझ्या आणि उद्धव यांच्यातील भांडणं लहान आहेत; महाराष्ट्र मोठा आहे.” त्यांनी मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली असे अंदाज यावरुन बांधले गेले आणि येथूनच चर्चेला उधाण आले.

उद्धव ठाकरे यांचे उत्तर

उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्याशी एकत्र येण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होते तेच होईल, असे म्हणत त्यांनीही मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात  “माझ्या आणि राज यांच्यातील भांडणं लहान आहेत; मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येऊया,” असे म्हटले आहे. त्यांनी मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येण्याची आवश्यकता देखील व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांचे मत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या युतीबाबत स्पष्ट केले आहे की, सध्या कोणतीही औपचारिक युती नाही. ते म्हणाले की, “राज आणि उद्धव यांच्यातील संवाद फक्त भावनिक आहे; सध्या कोणतीही युती नाही.” पण, युतीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे त्यांनी उघड बोलून दाखवले. तसेच, राजकीय वर्तुळातून येणाऱ्या प्रतिक्रियांवरही त्यांनी भाष्य केले. फक्त युतीच्या संकेतांनी जर एवढं रान उठलं असेल तर हे दोघे भाऊ एकत्र आले तर काय होईल या विचारांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. असे देखील ते म्हणाले.

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे

युतीच्या बाबतीत दोन्ही ठाकरे पुत्र यांनी देखील सकारात्मक संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी दोघे भाऊ एकत्र आले तर योग्यच आहे असे स्पष्टपणे आदित्य ठाकरे म्हणाले. तर, दोन्ही भावांनी आता चर्चा करायला हवी असे अमित ठाकरे म्हणाले.

भविष्यातील शक्यता

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती होईल की नाही, हे भविष्यात स्पष्ट होईल. परंतु, सध्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या संकेत दिले आहेत. जर ही युती झाली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची युती होणे म्हणजे मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणे, असे मानले जात आहे. परंतु, राजकिय समीकरण पाहता आता शिवसेना ठाकरे गटाची महाराष्ट्रासह मुंबईतील ताकद कमी झालेली आहे याची जाणीव ठाकरे गटाला आहेच. राज ठाकरे यांची मनसे विधानसभेला दणाणून आपटली हे सत्य देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ही युती ह्या दोन्ही पक्षांना नव्याने जीवनदान देण्याचे काम करेल यात शंका नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम

राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा भाजपवर परिणाम होईल का? तर अजिबात नाही. कारण, भाजपचा आपला एक वेगळा मतदार वर्ग आहे. मराठी मतदारांचा मोठा आकडा सध्या भाजपकडे देखील आहे हे विधानसभेच्या जोरदार विजयानंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस देखील या विषयांत फारसा रास घेताना दिसत नाहीयेत. “त्यांना एकत्र यावे वाटले तर ते येतील” असं वक्तव्य देखील फडणवीसांनी केले. पण, ह्या युतीचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पडू शकतो. ह्या युतीमुळे मत विभागण्याची शक्यता आहे.

माविआ वरील परिणाम

हे झालं सत्ताधाऱ्यांचे पण जर विरोधी गट म्हणजेच महाविकास आघाडीबद्दल बोलायचे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्धव आणि राज यांच्या युतीबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहे. अनेक वेळा सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्षपणे ह्या युतीचे स्वागत केले आहे. तसेच, स्वतः शरद पवार त्यांची राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गटात विलीन करणार अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक प्रसंगी हे दोन्ही गट एकत्र येताना दिसतात. आजही कौटुंबिक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते सोबत हजेरी लावताना दिसतात.

आता राहतो प्रश्न तो काँग्रेसचा. काँग्रेस हा पक्ष सध्या रसातळाला गेला आहे. राज्यात आणि देशात त्यांची काही वेगळी परिस्थिती दिसत नाही. त्याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट सोडून ईतर कुठलाही मित्रपक्ष नाही आणि स्वबळावर लढण्या इतकी सध्या काँग्रेस प्रबळ नाही. पण, राज ठाकरे यांनी युती साठी काँग्रेस सोबतची युती तोडण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला असल्याचे बोलले जाते.

जर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबतची युती तोडतील तर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा मिळणारा पाठिंबा हा ठाकरेंपासून दुरावू शकतो. मग आता ठाकरे काय निर्णय घेतील हे येणारा काळच सांगेल.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती होईल की नाही, हे भविष्यात स्पष्ट होईल. परंतु, सध्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या संकेत दिले आहेत. जर ही युती झाली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकते.

Aarti Dhabale

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?