Home » Today In Focus » उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याची घोषणाही लवकरच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्ष युती आणि आघाड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भेटीगाठीही वाढल्या आहेत. असे असतानाच विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्येही हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

भेटीनंतर सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. “प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आमच्यात एक चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल, पण आज भाजप धर्म आणि देश बुडवाला आला आहे, अशी टीका सपकाळ यांनी दिली.

निवडणुकांसाठी भेट घेणे महत्त्वाचे होते
“आज संघर्षाची वेळ आहे. भाजप लोकशाही बुडवायला निघाली आहे. त्यासाठीच संर्घष केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भेट घेणे महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.

मी राहूल गांधी यांच्यावर पुस्तक लिहिलेले आहे. तेच पुस्तक मी उद्धव ठाकरे यांना भेट दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढाव्या याबाबत दोन्ही पक्षाच्या काही भूमिका आहेत. आमचा निर्णय सविनय सांगितला जाईल. निवडणुकीची घोषणा झाल्यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. आमची चर्चा ही महाराष्ट्र वाचविण्यासाठी झाली. जे कोणी सोबत येतील त्यांना घेण्याचा आमचा विचार आहे, अशी भूमिकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली.

लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीत लढायच्या की एकत्र लढायच्या? याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावर घेतला जाईल. स्थानिक पातळीवर चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सपकाळ यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?