Home » राजकारण » शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन महापौरांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन महापौरांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

महापौर यांच्या विविध ठिकाणी भेटी

नांदेड, दि.१४ फेब्रुवारी:नवनिर्वाचित *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. शहर साखर झोपेत असताना सकाळी-सकाळी त्यांनी आज शहराच्या विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.

महापौरांनी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि अंतर्गत गल्ल्यांमधील स्वच्छतेची पाहणी केली. महापौरांनी प्रामुख्याने राज कॉर्नर, चैतन्य नगर एअरपोर्ट रोड, नमस्कार चौक, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टँड परिसर या भागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करून सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छतेच्या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या. त्यांनी एअरपोर्ट रोडवरील उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या त्याचप्रमाणे कचरा संकलन करणाऱ्या ‘घंटागाडी’च्या वेळेबाबत आणि नियमिततेबाबत नागरिकांशी संवाद साधला.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.याप्रसंगी महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छता अधिकारी बालाजी देसाई, स्वच्छता निरीक्षक किशन, तारू प्रियंका एंगडे आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी यावेळी दिले आहेत.

चौकट
*इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा प्रयोग*
यावेळी बोलताना महापौर सौ.मुळे म्हणाल्या की, इंदौरच्या धर्तीवर नांदेड शहरात स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असून स्वच्छ सुंदर शहर व्हावे, तसेच शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देणार आहोत.कचरा डेपोवरील प्रक्रिया आणि सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे आदेश सुध्दा महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. स्वच्छ व सुंदर नांदेड: “स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित नांदेड” हे आपले मुख्य ध्येय असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?