सध्या भारत -पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सैन्यदलासह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता वाशिम जिल्ह्यातील एका गावचा सुपुत्र कृष्णा अंभोरेने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेचे एक अनोखे उदाहरण देशासमोर मांडले आहे. नुकतेच कृष्णा विवाहबंधनात अडकला होता. त्याचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी काही क्षणाचाही विलंब न करता कृष्णा भारतमातेच्या सुरक्षेसाठी तात्काळ निघाल्याचे पाहायला मिळाले.

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र कृष्णा राजू अंभोरे याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. नुकतंच त्याने लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या केवळ दोनच दिवसांनंतर सैन्यदलाकडून त्याला बोलवण्यात आले. त्यानेही क्षणाचा विलंब न करता देशसेवेसाठी तात्काळ सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. तो भावनांच्या काठावर उभा राहून तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.
काल दुपारी २.३० वाजता कृष्णा अंभोरे हा उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला. तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. यामुळे गावातील वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी “जय जवान”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. “देश आधी, बाकी नंतर” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.




Users Today : 25