महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरे गटासोबत युती संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्रासमोर आमची भांडणं, वाद हे किरकोळ आहे, त्यामुळे एकत्र येण्यात मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भुमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे नेते सुहास दशरथे यांनी माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. लोकलमध्ये आम्ही सर्व नेते एकत्रच काम करतो, सगळ्यांना आनंद झाला, छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आनंद झाला. तो म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत, अशी प्रतिक्रिया या भेटीवर चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.




Users Today : 0