राजकारण काय घडेल याचा काही नेम नसतो. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (शनिवारी) पुण्यात भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर अजित पवारांनी या भेटीबाबत स्पष्टपणे सांगितलं. मात्र, राजकीय वर्तुळात आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि नेते जे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत ते छगन भुजबळ यांनी याबाबत जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या जळगाव दौऱ्यावर आहे. समता परिषदेचा मेळाव्यातून त्यांनी राज्यात शक्तिप्रदर्शन केलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळ नाराज आहेत. समता परिषदेतून त्यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचे नियोजन केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने डावलले गेलेले छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कोणाहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळांना काका-पुतण्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, संदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो, असे भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंद चर्चेवरही छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा करतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडलं? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.




Users Today : 39