औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून आता शरद पवार यांच्या गटात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलं आहे. पवारांच्या एका खासदाराने औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा केली आहे. तर आमदाराने औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. त्यामुळे शरद पवार गट या मुद्द्यावरून संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांची हत्या केली. त्यामुळे औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर खोदून काढावी, अशी मागणी होत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर ही मागणी लावून धरली आहे. या मागणीला विरोधकांकडूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. पण या मागणीवरून शरद पवार यांच्या गटातच फूट पडल्याचं दिसून येत आहे. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे. तर आमदार अभिजीत पाटील यांनी औरंगेजबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. त्यामुळे पवार गटातच औरंगजेबावरून बेबनाव असल्याचं स्पष्ट झालं आहे.
माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवराय आणि छात्रवीर संभाजी महाराजांच्या शौर्य तसेच पराक्रमाचं, गौरवाचं प्रतिक आहे. हा शौर्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळायला हवा, असं म्हणत अभिजीत पाटील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील मुख्य विषय आणि जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपचे नेते, मंत्री नितेश राणे यांच्यावर केली आहे.
खासदार निलेश लंके यांनी चार दिवसापूर्वी मीडियाशी संवाद साधला होता. औरंगजेब काही महापुरुष नव्हता की राष्ट्रपुरुष नव्हता. तो काही समाजसेवकही नव्हता. त्यामुळे या विषयाला सामाजिक रुप देण्याचं कारण नाही. त्याची कबर हटविण्यात काही गैर नाही. औरंगजेबाची कबर काढून टाकलीच पाहिजे, असं निलेश लंके म्हणाले होते. कबरीबाबत सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोपही लंके यांनी केला होता.
तरच अत्याचाराच्या घटना थांबतील
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यावरही अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गैरवर्तन करून स्त्रीया, मुलींचा अवमान करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी द्यायला हवी तरच ही वृत्ती बंद होईल. स्वराज्यातील छत्रपती शिवरायांच्या न्यायव्यवस्थेसारखी कठोर पावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचलावीत. तरच या अत्याचाराच्या घटना थांबतील, असं अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे.
माध्यमांसमोर येऊन कारणं सांगा
जिल्हा दूध संघ बरखास्तीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दूध संघ का अडचणीत आला? कश्यामुळे बरखास्तीची वेळ आली? याची कारणे रणजित शिंदेनी माध्यमांसमोर येऊन सांगावीत. दूध संघ अडचणीत का आला? आणि याचे नुकसान कसे भरुन काढले जाणार याची माहिती रणजित शिंदेनी जाहीर करावी, असं आव्हानच पाटील यांनी दिलं आहे.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
ऊसाच्या दरावरही त्यांनी भाष्य केलंय. विठ्ठल कारखान्याच्या रोलर पूजनप्रसंगी आणि सर्वसाधारण सभेत मी ऊस दराची घोषणा केलेली होती. मी कुठेही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ऊस दराच्या मुद्द्यावर बोललेलो नाही. विनाकारण ऊस दराचे राजकारण करू नये. जाहीर केलेला 3500 चा ऊस दर देणं माझ्या नैतिकतेचा विषय आहे. मी ऊस दर देणारच आहे, शेतकऱ्यांचा, मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.



