मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, खोक्याची दादागिरी, इतर अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मारहाणीचे व्हिडिओंनी बीडमधील राजकीय गुन्हेगारी, दादागिरी समोर आली आहे. एकमेकांविरोधात व्हिडिओची राळ आपण सोशल मीडियावर अनुभवली. आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज दिसून आला आहे. एका महिला वकिलाला गावातीलच सरपंचासह इतर आरोपींनी काठ्या, पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीने अंग काळंनिळं पडलं आहे.

अगदी किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा अशी विनंती या महिलेने गावातील सरपंचाकडे केली होती. त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर तिला तू पोलिसांकडे तक्रार कर, असे सांगितले. मदत दूरच सतत त्रास होत असल्याने मग महिला वकिलाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर संतापलेल्या सरपंचासह गावातील 10 पुरूषांनी या महिला वकिलाला बेदम मारहाण केली. काठ्या आणि जेसीबी पाईपाने एका शेतात नेत रिंगण करून अमानुष मारले. यात तिचे अंग काळंनिळं पडलं. या घटनेने पुन्हा एकदा बीडमध्ये चाललंय काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महिलेला अशी वागणूक देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.



