Home » Uncategorized » सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान

नांदेड, दि. २४फेब्रुवारी : जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकार राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कृषी विभागाशी संलग्न विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देशमुख, कृषी उपसंचालक श्री. वानखेडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा अनिल शिरफुले, जलसंधारण अधिकारी कांबळे, रेशीम विभागाच्या तंत्र अधिकारी कांचन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी तयार केलेल्या कृषी आराखड्यात आवश्यक सुधारणा करून उद्दिष्टपूर्ती निश्चित वेळेत करावी. यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीबाबत शेतकऱ्यांचा अभिप्राय जाणून घेऊन अडचणी तात्काळ दूर कराव्यात. तसेच शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून संवाद वाढवावा आणि समस्यांचे त्वरित निराकरण करावे. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या एकूण कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीत जिल्ह्यात एआयचा वापर, चिया व मका लागवडीस प्रोत्साहन, ‘एक लाख जलतारा’ उद्दिष्ट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरण, फार्मर कपतर्फे ५५० शेतकऱ्यांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण, महाडीबीटी अंतर्गत लाभ वितरण, यांत्रिकीकरण तसेच रब्बी हंगामातील पेरणी यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले.

तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, महारेशीम अभियानाची उद्दिष्टपूर्ती, रेशीम शेतीचे फायदे, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शेततळे व मत्स्यपालनातील कामगिरी, पशुधन लसीकरण आणि दूध उत्पादनवाढीच्या उपाययोजना यांची माहिती देण्यात आली. यासोबत जिल्हा उपनिबंधक कार्यालय, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, सिंचन विभाग, जिल्हा जलसंधारण विभाग, नाबार्ड, कापूस संशोधन केंद्र, अग्रणी बँक आदी विभागांचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांचे काम नियोजनबद्ध सुरू असल्याचे सांगितले. विशेषतः पशुसंवर्धन विभागाचे कार्य प्रगतीपथावर असून मत्स्यपालन क्षेत्रातही जनजागृती वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागीय समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना” अंतर्गत आज सकाळी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे रेशीम शेती तसेच विविध केंद्र पुरस्कृत योजनांची पाहणी डॉ. निधी पांडे यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्यासह संबंधित अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लोकमंच मराठी न्युज-राजेश लाठकर.

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?