Home » राज्य » भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन; नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन; नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग

दिनांक : 20/02/2026

लोकमंच मराठी नांदेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलनास नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार व जबाबदाऱ्यांनुसार स्वतंत्र व सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदोन्नतीसाठी स्पष्ट धोरण जाहीर करणे, वाढत्या कामाच्या ताणानुसार मनुष्यबळ वाढविणे तसेच सेवा अटी व सुविधा सुधारित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संघटनेच्या निर्णयानुसार दि. १८ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले असून दि. २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणी कामकाज बंद ठेवण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. दि. २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दि. २७ फेब्रुवारी रोजी जामाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास दि. २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात नांदेड भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. त्यामध्ये जी. वाय. न नरोडे , व्ही. के. टेकनूर , एस. जी. सुर्यवंशी, आर. एस. श्रीरामे , एम. बी.औटी, व्ही. के. चव्हाण, एस. ए. चंद्रे, एम. पी. कांबळे, एन. के. चवने , जी. बी. मोरे, पी. बी. नागमवाड, बी. बी. पट्टेवाले , एस. एम. हत्ते, व्ही. एम. ढोले, आर. ए. इदुरकर राजू गोरे आदी कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.

कर्मचाऱ्यांनी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. संबंधित मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?