Home » राज्य » बहुजनांचे सुराज्य बनविणारे – छत्रपती शिवाजी महाराज

बहुजनांचे सुराज्य बनविणारे – छत्रपती शिवाजी महाराज


​विज्ञान-तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी इतिहासाच्या पाऊलखुणा या समाजमनावर कायम कोरलेल्याच राहणार. ‘बहुजनांचे सुराज्य असले पाहिजे’ हे स्वप्न वास्तवात उतरविणारे, आजही समाजाला एक नवी दिशा देणारे, दूरदृष्टी विचार असणारे, कोणत्याही परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणारे, एक कुशल नेता, लोककल्याणकारी प्रशासक, दुर्जनांचा कर्दनकाळ, बहुजनांचा कैवारी, नवयुगाचा निर्माता असे अष्टपैलू आणि तेजस्वी व्यक्तिमत्व असणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
​”शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।”
​शिवरायांनी खरंच शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. अशक्य ते शक्य करून दाखविले त्यामुळेच त्यांचे आठवावे रूप आणि आठवावा प्रताप हे असे म्हणणे सार्थ ठरेल. सर्वांना समता, बंधुता, न्याय या तत्त्वाने वागवणारे राजे… गुलामगिरी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे प्रभावी व्यक्तिमत्व… आणि समाजाला दूरदृष्टी ठेवून नवा विचार देणाऱ्या या महापराक्रमी, शूरवीर राजाचा जन्म सह्याद्रीच्या कुशीत झाला.
​पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी गडावर शहाजीराजे आणि माँ जिजाऊंच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी हे दिव्यरत्न जन्मास आले. जणू का हा सर्वांसाठी सोनियाचाच दिवस ठरला. लहानपणापासूनच शिवरायांना मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायला, दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरायला आवडायचे. त्यांना शिक्षण, संस्कृती, धर्म, राजनीती, न्यायनिवाडा, तलवार चालवणे, घोडेस्वारी, कुस्ती खेळणे, दांडपट्टा आदी सर्वांचे शिक्षण मिळाले. सोबतच घरातील प्रगल्भ असे वातावरण यामुळे शिवरायांना बालवयातच वेगवेगळ्या समस्यांची जाण होऊ लागली होती. मुळात माता जिजाऊंनी त्यांच्यावर आदर्श संस्कारांचे बीज रुजवले होते. तसेच त्यांच्यामध्ये लढण्यासाठीचे नैतिक बळ दिले आणि शत्रूशी झुंज देण्यासाठीचे सामर्थ्य ठेवण्याची शिकवण सुद्धा माँसाहेबांनी त्यांना दिली होती. सोबतच माणसं मिळवणे आणि ती माणसं जोडण्याची मोलाची शिकवण सुद्धा माता जिजाऊंकडून शिवरायांना मिळाली. त्यांच्यावर जे संस्कार माँ जिजाऊंनी केले त्यामुळे…
​शिवबांनी सुद्धा प्रजेच्या बाबतीत कधीच जातिभेद केला नाही. त्यांची सर्वांवरच एक मजबूत पकड होती. विशेषतः त्यांच्यासोबत सर्वच जातींतील लोक होती आणि ती सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे काम करीत असत. अक्षरशः त्यांच्या सर्व महत्त्वाच्या पदावर हे सवंगडी होते आणि ते तेवढ्याच जबाबदारपणे आपली कामे करीत. अन्याय, अत्याचाराने हतबल झालेल्या प्रजेला नेहमीच न्याय देण्यासाठी शिवबा कायम तत्पर असायचे. अगदी बिकट परिस्थितीत त्यांनी न डगमगता स्वराज्य निर्मितीसाठी आदिवासी, अशिक्षित, गोरगरीब, ग्रामीण जनता आदी सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मितीसाठी घोडदौड केली. यात त्यांचे काही विश्वासू मावळे सुद्धा होती जी की शिवरायांच्या जीवाला जीव देणारी माणसं असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. यामध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, येसाजी कंक आदी सहकाऱ्यांचा उल्लेख करता येईल.
​तोरणा किल्ला जो महाराष्ट्रातील बळकट असणारा किल्ला आणि हा किल्ला शिवरायांनी जिंकून जणू काही स्वराज्याचे तोरणच बांधले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे किल्ले ताब्यात घेतले. राजगड, कोंढाणा, पुरंदर, प्रतापगड, पन्हाळा आदी सर्व ताब्यात घेतले.
​कोंढाणा हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्यामुळे ताब्यात आला खरा पण यात तानाजींसारखा वीर धारातीर्थी पडला. ही घटना जेव्हा शिवरायांना कळाली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि म्हणाले, “गड आला पण सिंह गेला!”
​शिवरायांनी दूरदृष्टी ठेवून काही सागरी किल्ले सुद्धा निर्माण केले. लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक मदत सुद्धा केली. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्त्वांची जोपासना तर केलीच पण एक सक्षम समाज घडवण्यासाठी तसेच समाजविकास आणि परिवर्तनाची दृष्टी सुद्धा त्यांनी कायम समोर ठेवली. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्यात शिवरायांची मोहर उमटली नाही. एक अजरामर कर्तृत्व करणारे महान राजे अशी कायम ओळख इतिहासात कोरली गेलेली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात जे मोलाचे कार्य केले, मार्गदर्शन आणि संदेश दिले ते येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी कायम मार्गदर्शक ठरणारे आहेत.
​आज शिवरायांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जवळजवळ ४ शतके होत आहेत. शिवरायांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जगाला जे मोलाचे संदेश देऊन कल्याणकारी राज्य किंबहुना राष्ट्र कसे असावे हे तेव्हाच सुचवले होते. एक नवी दिशा आणि दूरदृष्टी विचार दिले होते आणि त्यांचे विचार आत्मसात करणे आज महत्त्वाचे आहेत. अशा या तेजस्वी महापुरुषाच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी अभिवादन…

लोकमंच मराठी न्युज -राजेश लाठकर

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?