उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. शासकीय अदिकाऱ्यांकडून कामात काही कसूर राहिला की कशाचीही भिडभाड न पाहता, ते संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात. अजितदादांचे तसे अनेक व्हिडीओ याआधी व्हायरल झालेले आहेत. अजितदादा रोखठोक आणि कडक स्वभावाचे आहेत, असं म्हटलं जात असलं तरी त्यांची विनोदबुद्धीदेखील तेवढीच प्रभावी आहे. एखाद्या विषयावर बोलताना ते शब्दांचा चपखल वापर करून गंभीर वातावरणात हशा पिकवताना दिसतात. सध्या अजित पवार यांनी असेच एक मजेदार भाष्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करून मोठं मिश्किल विधान केलंय.

अजित पवार यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे मी देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन, या नावाचे एक पुस्तकही लिहायला सांगणार आहे, असे अजित पावर हसत हसत म्हणाले.
“ऐकलं का? हे पुस्तक केवळ वाचायला नव्हे तर विचार करायला लावणारे आहे, याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ हे पुस्तक लिहिलेले आहे. तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. मी आता त्यांना दुसरं एक पुस्तक लिहायला सांगणार आहे. मुंबईत गेलो की त्यांना ‘मी पुन्हा येईन’ हे पुस्तक लिहायला सांगणार आहे,” असे मिश्किल भाष्य अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.




Users Today : 0