Home » Today In Focus » अन्यथा मला आग लावावी लागेल नाना पटोलेंचा सरकारला इशारा

अन्यथा मला आग लावावी लागेल नाना पटोलेंचा सरकारला इशारा

कृषी पंपांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेती पिकांना पाणी देण्याकरिता गेलेल्या डाकराम देशमुख या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करीत त्यांचा बळी घेतलाय. ही घटना भंडाऱ्याच्या (Bhandara News) खैरीपट इथं सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी खैरीपट गावातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी नाना पटोले यांनी नरभक्षी वाघाचा (Tiger) तातडीनं बंदोबस्त लावा, असा गर्भित इशारा भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तर झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी मला आगं लावावी लागेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथे वाघाच्या हल्ल्यात डाकराम देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झालो. गेल्या 4 महिन्यांपासून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आवाज उठवला, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, आणि त्याचा परिणाम म्हणून आज एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

तर नाना पटोले यांनी ग्रामस्थांच्या संतप्त भावना वनमंत्री गणेश नाईक यांना सांगितल्या. सोबतच भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांना फोनवर संपर्क साधून लाखांदूर तालुक्यात एक- दोन नव्हे तर तब्बल चार वाघ गावालगत मागील पाच – सहा महिन्यांपासून फिरत असून अनेकांचे पाळीव जनावर फस्त केल्याचे सांगितले. माणसांनी आता जगायचं की नाही? इकडं वाघ असल्यानं रात्रीचा कृषी वीजपुरवठा बंद करून तो दिवसा द्यावा. राज्याचं सरकार आणि प्रशासन झोपेत असून शेतकऱ्यांचा वन्यप्राणी बळी घेत असल्यानं प्रशासनानं या नरभक्षी वाघांचा तातडीनं बंदोबस्त लावावा अन्यथा मला आगं लावावी लागेल, असा गर्भित इशारा नाना पटोले यांनी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?