खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता.
दरम्यान, 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मनू यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाही, या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली. जयेशने मनू यांच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने मनू याने जयेशला हाताबुकयांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले. यात जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनू शर्मा याला अटक केली.



