शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांचे तोंड द्यावे लागते. शेतीत पेरणी करण्यापासून ते काढणीपर्यंत खूप कष्ट करुन चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. शेती करत असताना शेतकऱ्यांना मजुरांची देखील गरज लागते. कुठल्याही शेतातील पीक काढण्यासाठी, औषध फवारणीसाठी, खत घालण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु मजूर टंचाईमुळे शेतकरी हतबल झालेला दिसतो. चोपडा तालुक्यात सध्या तूर कापणी सुरू आहे.
या तूर कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी जुगाड करताना दिसत आहेत. चोपडा तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतातील तूर कापण्यासाठी चक्क झाड कापण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या कटरची मदत घेत आहेत. या कटरच्या साहाय्याने तूर कापत आहेत. आठ एकर शेतातील तूर कापण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागले असते व आठ ते दहा दिवस तूर कापणी सुरू राहिली असती परंतु या यंत्रणाच्या साहाय्याने तीन जणांच्या माध्यमातून तूर कापणीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. वेळेसोबत मजुरीची ही बचत होते अशी प्रतिक्रिया तूर उत्पादक शेतकऱ्याने दिली आहे.




Users Today : 2